बहुतेक दुसरीच्या वर्गात ही गंमत झाली होती. एका शनीवारी आमच्या वर्गातला एक मुलगा सकाळी आला तेव्हा त्याच्या कपाळावर लाल काळा डाग दिसत होता. कपाळावर मारुती आला म्हणून मिरवत होता. थोडा मस्का मारल्यावर त्यानी रहस्यभेद केला.कपाळावर बोटानी एकशे अकरा वेळा मारुतीचं नाव घेऊन कपाळ घासलं की मारुती येतो. मधल्या सुटीपर्यंत वर्गातल्या बहुतेक कपाळांवर मारुतीराया प्रकटले होते.त्यानंतरच्या रामायणाला सोमवारी सगळे पालक हजर होते. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे असं की मार्केटमध्ये रोज असा काहीतरी फंडा यायचा. एक कुठलीतरी अफवा यायची मग दिवसभर तेच तेच सारखं एकमेकांना ऐकवायचं.
अशा आवया आणि त्यानुसार गुंतवणूकीचे निर्णय खरं म्हणजे अशास्त्रीय निर्णयाचा कळस.पण त्यावेळी इंटरनेट किंवा संगणक काहीच उपलब्ध नव्हतं .क्लच ऑटोची टिप दर तीन महिन्यानी यायची. क्लचऑटोचा काऊंटर जोरात चालायचा.आदल्या आवईच्या वेळी फसलेले गूंतवणूकदार मोकळे व्हायचे आणि नविन अडकायचे.अशी खबर देणार्‍या माणसाला खबरी म्हणायचे.ब्रोकरच्या किंवा कंपनी डायरेक्टरच्या पुठ्ठ्यातली माणसं फिरत असायची.त्याच्या पाठी लोंबत्यासारखे फिरून छातीठोक बातम्या आणणारी ही माणसं एकच डायलॉग सारखा मारायची.एकच उपदेश करायची घरदार विकून हे शेअर घेऊन टाक.त्यांना घरदार विकणं शक्य नसायचं कारण ते भाड्याच्या घरात रहायचे.या सगळ्या “ढ” क्लासच्या शेअर्सना धारावी म्हणायचे. रींगच्या एका टोकाला धारावी ट्रेडींग करणार्‍यांचा दलालांचा एक वेगळा जथा असायचा.पण धारावी ते ब्ल्यु चीप असा प्रवास करणार्‍या कंपन्या पण बघीतल्या आहेत.मोझर बेअर एके काळची धारावी स्क्रीप.

आता संगणकाच्या युगात ही जमात नाहीशी झालेली नाही .आता हे लोक फक्त टाय लावून सीएनबीसी वर बोलत असतात.

गुंतवणूकीच्या नाना तर्‍हा. काहीजण लो बजेटवाले. ते फक्त दोन -अडीच-साडेतीन रुपयांचे शेअर्स घ्यायचे. एखादा मेगाइश्यु येऊन गेला की या लोकांना भयंकर आसूरी आनंद व्हायचा .सुरुवातीची गरमागरमी संपली की तो शेअर जो पडायचा तो सरळ लो बजेटवाल्यांकडे. मंगलोर पेट्रो केमीकल- जिंदाल विजयनगर कित्येक उदाहरणं.माझ्या ओळखीचे एक बँक मॅनेजर आहेत. त्यांनी जिंदालचे वीस हजार समभाग साडेचार रुपयाच्या हिशोबानी घेतले होते.बघा आजचा भाव काय आहे.असा हिशोब केला तर आतापर्यंत त्यांच्याकडे काही कोटी असायला पाहीजेत पण नाहीय्येत.जिंदालचा भाव बारा रुपये झाल्यावर सगळे शेअर विकून त्यांनी दोन रुपयात मोदी सिमेंट घेतले.
मोदीचं सिमेंट नंतर एव्हढं घट्ट झालं की गुंतवणूकदार अडकूनच पडले.

असे नाना पंथ. नाना जमाती. त्यांचे देव .त्यांचे पुजारी आणि पुजक.

काही मंडळी सकाळपासून मोठ्या ब्रोकरपाठी फिरत असायची.तेव्हांचे मार्केट आयडॉल म्हणजे मनू माणेक .शांती बाळू. जी. एस.दमाणी. घनश्याम बागडी, पल्लव सेठ.(हर्षद मेहेता कंचनलालच्या दुसर्‍या मजल्यावरच्या ऑफीसमध्ये उभा असायचा.मी मार्केटमध्ये आलो तेव्हा त्याच्या बॅंकरप्टीचा दुसरा एपीसोड चालला होता.अजय कान(कलकत्ता)आणि हर्षद मेहेता ही कुस्ती अनिर्णीत होती.)
पण हे सगळं नंतर.
शांती बाळू दुर्योधनासारखा मांडी दाखवत धोतर वर घेउन उभा असायचा. त्याच्याकडे दोन कार्ड होती एक शांती बाळू आणि दुसरं हरीश शांती. शांती बाळू मध्ये फक्त सट्टा. एका हातात धोतराचं टोक. दुसर्‍या हातात इकोलॅकची काळी छोटी ब्रिफकेस.इकोलॅकची बॅग तेव्हा स्टेटस सिंबॉल होतं. त्याच्या पुढे पाठी त्याचे भक्त.फुटपाथवरून हाताची बोटं नाचवत सौदे करायचा.
दुपारच्या वेळी पल्लव सेठ यायचा. आयटीसी बुल त्याचं टोपण नाव. शांती बाळू आणि त्याच्यासारख्या जुन्या स्टाईलच्या ब्रोकरांपेक्षा वेगळीच स्टाईल. पल्लव सेठ सी.ए. असल्यामुळे कार्ड प्रोफेशनल कॅटेगरीमधून मिळालेले. ब्रँडेड शर्टस्, टाय असा वेश. पेरीग्रीन बरोबर टाय अप. त्याला येताना पाह्यलं की शांती बाळूच्या आसपासची माणसं त्याच्यापाठी धावत सुटायची. तो ज्या लिफ्टमध्ये जाईल त्या लिफ्ट मध्ये माणसं घुसायची. एखादा शब्द तरी बोलावा याच्यासाठी वेड्यासारखी त्याच्या चेहेर्‍याकडे बघत रहायची.हर्षद मेहेताबरोबर पल्लव सेठ पण संपला.किशोर जनानी पण संपला.एक दोघंच टि़कले . त्यापैकी एक वल्लभ भन्साळी आणि दुसरा निमिष शहा. एखाद्या कंपनीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून गुंतवणूक करायचे तंत्र वल्लभ भन्साळीनी आणले.त्यामुळे तेजी-मंदी चा काहीही असर एनॅमवर कधीच पडला नाही.एक आथवण येण्यासारखा बिचार जीव म्हणजे बिमल गांधी. अत्यंत प्रामाणिक.सेसा गोवाचा हाउस ब्रोकर्.त्याच्या सगळ्या ग्राहकांनी आपापली जिंदगी बनवली त्याच्या जीवावर. संगणकाचा उपयोग करणारा पहिला ब्रोकर.
परदेशी कंपन्या आल्यावर फक्त प्रोफेशनल दलाल टिकले बाकी सगळे काळाच्या पडद्याआड गेले.हेमेंद्र कोठारी , महेंद्र कंपाणी .हे सगळे जुन्या पठडीचे सेठ . त्यावेळी सरकारी कर्जरोख्यात सगळेच बनवाबनवी करायचे.ते जे करत होते ते हर्षद मेहेतानी नंतर हजार पट मोठ्या प्रमाणात केलं.*
या दोन्ही कॅटेगरीला पुरून उरला तो मनू माणेक. कच्छी विसा ओसवाल. पैशाची मूर्तीमंत ताकद. मंदीचा बारमाही पुरस्कर्ता.खरंम्हणजे व्याज बदल्याच्या जोरावर बहुतेक दलालांना अंगठ्याखाली दाबून ठेवायचा.टेरर माणूस.
हे सगळे नजारे बघता बघता माझं पहिलं वर्ष आणि बिगीनर्स लक पण संपलं.
————————————————————————————————————————————————
बाजारात गेल्यापासून तिथल्या काही सवयी मला पण चिकटल्या होत्या.
१ घरून जेवूनच बाहेर पडायचं.
२ मार्केट संपल्यावर तिथंच रेंगाळत रहायच.
३ देव ,देवाचा फोटो, देवा ची मूर्ती यांना उठसूट नमस्कार करत रहायचं.
४ मोठ्ठ्यानी पादायला लाजायचं नाही.
५ तोंड बंद न करता समोरच्या माणसाच्या तोंडावर ढेकर द्यायची.
६ संध्याकाळी रस्त्यावर उभं राहून वांझोट्या चर्चा करायच्या.
बरोज वेलकम चा सट्टा करायचं ठरवलं तेव्हा रोज फायनान्सर शोधायची मोहीम सुरु झाली.पहिला फायनान्सर भारत कटलरीवाला जैन. यांचं चांदीच्या भांड्याचं मोठ काम होतं. उपयोगात नसलेले पैसे रास पडलेले असायचे.व्याज बदला फक्त ए ग्रूपच्या शेअरमध्ये ऑफीशिअली अलाउड होता.ज्यांना बी टाईपच्या शेअरमध्ये बदला करायचा असेल त्यांना खाजगी पैसे मिळायचे. व्याज भरमसाट .पण सट्टा सही चालला तर काही फरक पडायचा नाही. त्यांनी साडेसात लाख कबूल केले. आणखी पंधराएक लाख उभे करायचे होतें. नरेंद्र नावाचा एक दलाल मला प्रिया डायकेम नावाच्या कंपनीत पोद्दार चेंबरच्या ऑफीसमध्ये घेऊन गेला. त्याच्या दलाली पद्धतीने पार्टीविषयी भरपूर माहिती दिली होती. दुपारी चार वाजता मी, नरेंद्र आणि माझा सी.ए. मित्र ऑफीसला पोहचलो. फायनान्सर (त्यांना बाबूजी म्हणायचे) त्यांच्या केबीनमध्ये नव्हते. त्यांच्या पीएनी आत बसायला सांगीतलं. पाच मिनीटानी बाबूजी आत आले. त्यांनी धोतर लुंगीसारखं गुंडाळलं होतं. नमश्कार असं म्हणून आम्हाला वळसा घालून त्यांच्या खुर्चीत बसायला गेले. ते कुठून आले होते हे सांगायला नको होतं .मागच्या बाजूला धोतर ओलं होउन ठिकठिकाणी चिपकलं होतं.खुर्चीत बसून एक लांबलचक ढेकर देऊन म्हणाले
“बोलो मालीक. कितना रोकडा चाहीये?
चाय ला रे.”
चहा आला.
मी म्हटलं “पंधरा लाख.”
सट्टा कौनसे आयटम मे करोगे . परत ढेकर.दुपारी कांदा खाल्ला असावा.
“कितने दिन के लिये?”
“त्रण महीना . “नरेंद्रनी उत्तर दिलं.
आता बाबूजींनी समोरच्या फायलीतून काहीतरी शोधायला सुरुवात केली. आम्ही आदल्या दिवशी आमची फाईल पाठवली होती.
आमच्या अपेक्षा वाढल्या. इथं काम झालं असतं तर आणखी फिरायची आवश्यकता नव्हती.
“हमारा अंदाज से तुमको जादा पैसा लगेगा. “बाबूजी म्हणाले.
फायलीच्या गट्ठ्यातली शोधाशोध चालूच.
“अगर फाईल नही मिलता है तो दुसरा…..”
असं म्हणेपर्यंत बाबूजींना हवी असलेली वस्तू सापडली.
गठ्ठ्याखालून त्यांची चड्डी बाहेर काढली.
इलास्टीक चेक केलं . एकदा उलटीसुलटी केली,उभे राहिले. साटकन आवाज करत चड्डी घातली.
“बोलो अभी बोलो.”त्यांच्या चेहेर्‍यावर एक सात्वीक समाधान झळकायला लागलं
काय कप्पाळ बोलणार. माझ्या नाकातून चहा बाहेर येत होणार होता.
व्याजाची बोलणी सुरु झाली.
मध्येच बाबूजींच्या चेहेर्‍यावर एक त्रासीक भाव आला.
माझ्या मनात आलं “आता काय?”
काही नाही.बाबूजी खुर्चीत ज..र्रा अपीश झाले आणि ट्रँव ट्रँव करून दिर्घ पादले.
“चलो आगे बोलो.”
त्या दिवशी जे हसू दाबण्यासाठी प्रचंड प्रयत्न करायला लागले त्याची तुलना कशालाच नाही.
नरेंद्र सारखा म्हणत होता इतना हसनेका क्यु?
बाबूजीने जराक गेसनी तकलीफ छे.

खरं म्हणजे ह्या आठवणींचा उपयोग एकच.
आता पोटात काही नसताना हा किस्सा आठवून हसायला बरं पडतं. दोन मिनीटं भूक पोटाला कमी कुरतडते.
बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
———————————————————————————————-

चौदा ऑगस्ट १९९६. मी जीजीभाई टॉवर्सची पायरी खाली उतरलो.सोबत एक जुना मित्र होता.
सो, पती गयु? त्यानी विचारलं.
येस. नो रीग्रेट्स.मी उत्तर दिलं.
वो बेड डिलीवरी का क्या करेगा? त्यानी सहज विचारलं असावं.
राईट ऑफ किया है.तेरेको चाहीये तो लेके जा.सुधार ले.बेच डाल.मी उत्तर दिलं.
बिचारा काहीच बोलला नाही. आम्ही वळून युनीयन बँकेकडे आलो होतो.
सेंडविच खायेगा?कलसे तो तू नही आनेवाला.
चल खा लेते है.
रात्री घरी जायचं की नाही हा पण विचार केला नव्हता.मनात प्रचंड हलकल्लोळ माजला होता.आज दुपारी बसून ब्रोकरचा हिशोब संपवला होता. चेक जेमतेम पस्तीस हजाराचा आणि बॅड डिलीव्हरीचा गठ्ठा हातात होता. पुढे काय? काहीही ठरलं नव्हतं.दलाल स्ट्रीटवर आलेला माणूस इथेच कायम राहतो.सौदा असू दे वा नसू दे. उन ,पाऊस, वारा, बंद ,दंगल ,जयंती , श्राद्ध, काहीही असू दे पाय इथून हलता हलत नाही.
संध्याकाळी स्टॉकमधला शेवटचा पतंग कटल्यानंतर हातात मांज्याचा गुंता आणि रिकामी फिरकी घेउन घरी जाताना खरचटलेले गुडखे जास्तच चुरचूरून दुखायला लागतात तसं काहीसं वाटत होतं.डोळ्यांच्या कडा जळजळायला लागतात ताप आल्यासारखं वाटायला लागतं .लक्षणं तशीच होती सगळी पण हा खेळ नव्हता.उद्या परत नविन पतंग मिळणार नव्हता.
परमेशाच्या स्टॉलवर आलो. सेंडविच खायेंगे .वोल्गा का पान खायेंगे.तेरेको आज फेअरवेल पार्टी.माझा मित्र म्हणाला.
वाक्य संपता संपता तो रडायला लागला.पोस्टाच्या पायरीवर बसून अम्ही दोघही मनमोकळं रडलो.
स्साला ,तू स्पॉटका काम नही करना चाहिये था. अच्छा एनालीस्ट है.इलीयट तूच सिखाया ना जयंतीभाईको?
अब ये सोचके क्या फायदा. दिवालीया तो बोल दिया ना वो. सौदा तो कभी नही लिखना नही है.असं म्हणता म्हणता मी परत एकदा रडायला लागलो.
जाने दे आगेका क्या सोचा है.त्यानी विचारलं.
कुछ नही. थोडी मूडी है. देखो क्या होता है.
सँडविच संपवून आम्ही निघालोच.
वोल्गा का पान?
नही. अब वोल्गा को भूलना है.
मै आता हूं व्हीटीतक .
नही यार तू जा. मी जवळ जवळ ओरडलोच.बिचारा रडवेला झाला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावलं .
लेकीन तू सिध्धा घर जायेगा ना? त्यानी विचारलं.
हा बाबा . एव्हढं बोलून निघालोच.
गाडीत बसल्यावर मनु मंगळचा एक जॉबर दिसला. गाडी सोडून दिली.कुर्ला गाडी पकडली.विंडो जवळ बसून विचार करायला लागलो.
१९८२ साली या मार्केटमध्ये आलो तेव्हा जे हातात होतं तेव्हढंच आज हातात होतं.म्हणजे काहीच नव्हतं.
आलो नाही गेलो नाही. मध्यंतरी झाले ते सगळे भास.
———————————————————————————————-माझा पहिला ब्रोकर बिपीन देवाणी. माझ्या मित्राचा मोठा भाऊ.तेव्हा सब ब्रोकरला पण ब्रोकरचा मान होता.एका ब्रोकरला सहा बेच(बॅच) मिळायचे.माझ्या मित्रानी माझी ओळख करून दिली.
तुम्हारा बेंक अकाउंट है क्या? पहिला प्रश्न.
हा. है ना. मी माझं पासबुक काढून दाखवलं.पेण अर्बन कोऑपरेटीव बँकेचं पासबुक पाहिल्यावर तो पण गडबडला.पंकज राच नावाचा त्याचा पार्टनर होता.
त्यानी सांगीतलं ये नही चलेगा. बेंक ओफ इंडीया का खाता चाहिये.
त्यानी माझ्या मित्राकडे पाह्यलं.माझ्याकडे पाह्यलं.हताश मुद्रा करून म्हणाला
बोलो कौनसा शॅर लेनेका है?
मी यादी काढली.
एशीयन हॉटेल पाचसो शेअर लेनेका है.
सूं भाव छे.
बारा रुपया पचास पैसा.
केश मा छे.
मी खिशातून पैसे काढून दाखवले.
देखो केश है.
आ घाटीने क्यांथी ले आयवो? माझ्या मित्राला त्यानी विचारलं.
मला राग आला होता. मी म्हटलं मै घाटी नही.ब्राम्हण है.त्याच्यावर काही फरक पडलेला दिसला नाही.
इ बद्धो एकच असं काहीतरी तो म्हणाला.पहिला सौदा लिहीताना त्यानी कंडीशन घातल्या होत्या. दलाली दो टक्का.
मेरा काम तारवणी का है.तारवणी म्हणजे जॉबींग.एका ब्रोकरला सहा बेच(बॅच) मिळायचे.
छोटा सौदा नही मिला तो रोनेका नही.
कन्फर्मेसन शामको मिलेगा.चेक तभीच तयार चाहिये.
वायदेका सौदा नही लिखूंगा. माना हलवत सगळ्या अटी मान्य केल्या होत्या.नेहेमी घ्यायला गेलं तर त्या दिवशीचा हाय्येस्ट भाव. विकायला गेलं तर लोएस्ट भाव. हुज्जतघालायचा प्रश्नच नाही. सौदा बंद.
आताचे दलालीचे दर बघताना कळतं ब्रोकर किती पिळत होता. भावफरक आणि दोन टक्के.
मी राग गिळला. महाराष्टीयन ब्रोकर एक दोनच.आगाशे आणि नाबर.नाबर आणि कंपनी. तिथे जाऊन प्रयत्न करून आलो होतो.पण तिथे नाबर कोणी नव्हताच. सगळेच सुरेस, रमेस ,राजेस आणि सिनीअर सगळे कांतीकाका किंवा कानजीभाई.मराठी माणसाकडे फारच संशयानी बघायला लागायचे.(कदाचीत माझा चेहेरा असेल तसा.)
पण मी घाटी हा सल कायमचा मनात राहीला.हा राग प्रचंड होता .मार्केट सोडेस्तोवर मी कुठल्याच ब्रोकरला भाई म्हणून हाक मारली नाही.
एशियन हॉटेल कम डिवीडंड होता हे मला माहिती नव्हतं.शाळेत शिकलेला समभाग आणि कर्जरोखे हा धडा इतकचं ज्ञान.दोन दिवसानी बिपीन कडे गेलो तेव्हा मला बघून म्हणाला अगले पतावट मे डिलीव्हरी आयेगा. अभी चेक दे दो.फायदा है .देड रुपया डिवीडंड का.और भाव भी बढ गया.भाव साडेपंधरा रुपये झाला होता.
आता हळूहळू दलाल स्ट्रीटचा कारभार समजायला लागला होता. मी फारच वेगानी एकेक गोष्ट शिकत गेलो.हातात ब्लॉक घेऊन ,कोट घालून तो कधी येतो याची वाट दुसर्‍या मजल्यावरच्या जिन्यावर आम्ही थांबायचो.आपला ब्रोकर दिसला की धावत जाउन ऑर्डर हातात द्यायची. ह्या बाबाचं तोंड पानानी गच्च भरलेलं असायचं.
इतना सौदा लिखनेका टाईम नही है आज.अशीसगळी मग्रूरी ऐकायची आणि शक्य तेव्हढे सौदे पदरात पाडून घ्यायचे
एशियन होटेल नंतर अल्कील अमाइन , ग्रिंडवेल नॉर्टन, सगळे पेनी शेअर्स. सहा सात महिन्यानी पन्नास साठटक्के भाव वाढले.
बिपीन पंकज आता मला विचारायला लागले होते क्या ध्यान लगता है?
आमच्या घरी मात्र फार कौतुक . पोस्टात पैसे ठेवणं आणि अडीअडचणीला काढणं या पलीकडे माहिती नाही.पोस्टातून रंगीबेरंगी ऍन्युअल रीपोर्ट यायला लागल्यापासून भाव सॉलीड वधारला होता.
कायनेटीक होंडाच्या इश्यु नंतर मात्र एका नविन वळणाला सुरुवात झाली.सिटी बँकेपासून बद्रीमहल पर्यंत रांग होती इश्युचे फॉर्म भरायला.माझ्यासारखे मध्यमवर्गीय बाजारात यायला सुरुवात झाली होती.
———————————————————————————————-
एकदा दुपारी मार्कॅटमध्ये संतोष रत्नाकर भेटला. भाऊ, इकडे कुठे?
तू काय करतोयस इथे ते सांग.
व्ही.डी. सोंडे नावाचे इन्कम टॅक्स कमीशनर मार्केटचे एम.डी झाले होते.संतोष त्यांच्या ओळखीनी बोर्डात (शेअरबाजार चालवणारी संस्था) लागला होता.त्याच्याबरोबर वर सत्ताविसाव्या माळ्यावर गेलो.साहेबांशी ओळख झाली.बोर्डात ९०%माणसं मराठी. बाकी गुजराती. नोटीस इंग्रजीसोबत गुजरातीत पण इश्यु व्हायच्या म्हणून .
आता लक्षात आलं बोर्ड आणि बाजार गुजराथी आणि मारवाडी व्यापार्‍यांचा. नोकर सगळे मराठी. मराठी म्हणजे घाटी .घाटी म्हणजे नोकर असं समीकरण .
तायशेट्ये नावाचे गृहस्थ एक हाती सत्ताविस माळ्याची देखरेख बघायचे.ते मला म्हणाले बघा बरं संभाळून रहा. आपण पैशानी कमी पडतो या लोकांपुढे.लुबाडले जाल बरं.
थोड्या वेळानी म्हणाले ,
असं का करत नाही. दुसर्‍या मजल्यावर कापली रूम च्या बाजूला एक कँटीन करायचा बोर्डाचा विचार आहे. तुम्ही ते चालवा.
मी नाही म्हणालो पण आज वाटत होतं तेच करायला पाहिजे होतं.

Hello world!

ऑगस्ट 30, 2008

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!